अडचणीच्या काळात आम्हाला सोडून गेलेल्यांना अजूनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडतात
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील अनेक बडे नेते पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेले होते. त्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हेदेखील होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील सभेदरम्यान जयकुमार गोरे यांना मंत्रिपद देण्याचं जाहीर आश्वासन दिलं होतं. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं तर भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसावं लागलं आहे. यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता गोरे यांना टोला लगावला आहे.
अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या काही जणांना अजूनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडतात, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना नाव न घेता लगावला. विधानसभेच्या तोंडावर जयकुमार गोरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती धरला. साताऱ्यातील माण खटावचे ते आमदार आहेत.
सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालायात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस बळकट होत चालल्याचा विश्वास व्यक्त केला.