लॉकडाऊनमध्ये ईएमआय भरणाऱ्यांच्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणार
दिवाळी आधी बँकांनी कर्जदारांना खुशखबर दिली आहे. बँकेतून कर्ज घेतलेल्या ज्या ग्राहकांनी लॉकडाऊनदरम्यान नियमित ईएमआय भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्व बँका लोन मोरेटोरियम योजनेचा फायदा घेणाऱ्या कर्जदारांकडून घेतेलेले व्याजावरील व्याज परत करण्यास सुरुवात करत आहेत.
बँका आणि वित्तीय संस्थांकडून २ कोटी पर्यंतचे कर्ज घेणारे वैयक्तिक कर्जदार ते छोटे व्यापारी सर्वांना कॅशबॅक देण्यास सुरूवात होत आहे. बँकांकडून अशा कर्जदारांना देखील रिफंड मिळत आहे, ज्यांनी लोन मोरेटोरियम योजनेसाठी अप्लाय केले नव्हते.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्याकडून EMIवर घेतलेले व्याजावरचे व्याज कॅशबॅकच्या स्वरुपात परत देण्यात येणार आहे. बँकांना ५ नोव्हेंबरपासून ही योजना लागू करण्यास सांगितले होते.
सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर केंद्र सरकारने लोन मोरेटोरियम कालावधी दरम्यान कर्जदारांवर लावण्यात आलेल्या चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यामधील फरकाइतकी रक्कम कर्जदारांना परत करण्यास मंजूरी दिली आहे.
यानंतर केंद्रीय बँकेने सर्व बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांना ५ नोव्हेंबरपासून व्याजमाफी योजना लागू करण्यास सांगितले होते, सर्व कर्जदात्यांनी ही योजना ४ नोव्हेंबरपासून लागू केली आहे.
ही योजना आठ प्रकारच्या कर्जावर लागू होईल. यामध्ये एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, कंझ्यूमर ड्यूरेबल्स लोन, क्रेडिट कार्ड पेमेंट, ऑटोमोबाइल लोन, वैयक्तिक कर्ज आणि कंझम्प्शन लोन असेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील आठवड्यात सर्व बँकांना सांगितले होते की, “दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान वेळेवर हफ्ता भरणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक द्या.”
ही योजना ५ नोव्हेंबरपासून लागू करावी असे निर्देशही रिझर्व्ह बँकेने दिले होते. त्यानुसार आता बँकांकडून लॉकडाऊनदरम्यान लोन मोरेटोरियमचा लाभ न घेणाऱ्या ग्राहकांना रिफंड दिला जात आहे.