काय आहे कॅनडा कॉर्नर चा इतिहास

काय आहे कॅनडा कॉर्नर चा इतिहास 

धुनकरबार्इ ते कॅनडा हॉस्पिटल!

नाशिक शहराच्या जडणघडणीत वेळोवेळी निर्माण झालेल्या आरोग्यसेवा, सुविधा देणाऱ्या संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात...

नाशिक शहराच्या जडणघडणीत वेळोवेळी निर्माण झालेल्या आरोग्यसेवा, सुविधा देणाऱ्या संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात. यात नाशिकचे कॅनडा हॉस्पिटलही आहे. हे हॉस्पिटल आता नसले तरी त्या नावाने शहरातील महत्त्वाचा चौक निर्माण झाल्याने याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता आहे. कॅनडा हे नाव या चौकाला का पडले, ते कोठे होते, त्यापूर्वी तेथे काय होते अशा प्रश्नांची उत्तरे या अल्बममधून.

नाशिकच्या प्रत्येक चौकाला एक इतिहास आहे आणि त्या इतिहासामागे शहराची जडणघडण कशी होत गेली याचा रोचक प्रवास. हा प्रवास विस्मृतित गेला आहे अथवा इतिहासाच्या पानांमध्ये दडला आहे. तो अनेकदा आपल्याला अस्वस्थ करतो. शरणपूर रोडवरील कॅनडा कॉर्नर हा चौक आता नाशिकचा महत्त्वाचा चौक आहे. पण, कॅनडा हे नाव या चौकाला कसं पडलं असेल, हा प्रवास गंमतीशीर आहे. कॅनडा कॉर्नर येथील सध्या बीएसएनएल ऑफिस आहे, तेथे पूर्वी धुनकरबार्इ हॉस्पिटल एका खासगी संस्थेकडून चालविले जात होतं. एखाद्या महिलेच्या नावाने चालविले जात असलेले हे नाशिकमधील पहिले हॉस्पिटल म्हणावे लागेल. सन १९०४ रोजी नाशिक नगरपालिकेच्या एका कमिटी सदस्याने झेना बायबल मेडिकल मिशनच्या प्रमुख डॉ. मिस आर. हारवे यांना सुचविले की, त्यांच्या झेना मिशनने शरणपूरमध्ये सुरू असलेले धुनकरबार्इ हॉस्पिटल दहा वर्षांसाठी चालविण्यासाठी भाडे करारावर घ्यावे. यामुळे झेना मिशनला हॉस्पिटलसाठी जागा मिळणार होती, तर धुनकरबार्इ हॉस्पिटलला ट्रेन डॉक्टर स्टाफ मिळणार होता. महत्त्वाचे म्हणजे याचा फायदा नाशिककरांना होणार होता.

झेना मिशनने हे धुनकरबार्इ हॉस्पिटल चालविण्यास घेतले. यावेळी या हॉस्पिटला कॅनडा हॉस्पिटल म्हटले जात नव्हते. ते धुनकरबार्इ व झेना मिशन हॉस्पिटल म्हणूनच चालविले जाऊ लागले. सन १९१४ मध्ये झेना मिशनचा धुनकरबाई हॉस्पिटलशी करार संपला. धुनकरबार्इ हॉस्पिटल पंचवटीत नवीन इमारतीत स्थलांतर होणार असल्याने ही जागा व जुनी इमारत झेना मिशनने विकत घेतली व १९१४ मध्येच तात्पुरती कॅनडा हॉस्पिटलची इमारत पूर्ण झाली. यासाठी कॅनडातील लोकांनी मिशनला निधी दिला म्हणून त्याला कॅनडा हॉस्पिटल म्हटले जाऊ लागले. या इमारतीत ३२ खाटांचे हॉस्पिटल सुरू झाले. त्यात दहा खाटा या लहान मुलांसाठी आरक्षित असतं. सरकारकडून हॉस्पिटलला नऊ हजार रुपये ग्रँट मिळे, तर इमारतीसाठी १९,८३४ रुपये निधी मिळाला होता. सन १९१९ मध्ये ४४५ रुग्णांवर कॅनडा हॉस्पिटलमध्ये उपचार झाले होते, तर ७१४० रुग्णांनी बाह्य रुग्णसेवेचा लाभ घेतला होता. याच दरम्यान १९१४-१८ मध्ये प्लेगच्या साथीने नाशिकमध्ये धुडगूस घातला होता. यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य सुविधांबरोबरच उंदरांना पकडण्यासाठी पिंजरेही वाटप केले होते. त्यावेळी नाशिकच्या सिव्हिल, हॅरिस व कॅनडा हॉस्पिटलने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

कॅनडा हॉस्पिटल आज अस्थित्वात नसले तरी त्याच्या आठवणी मात्र, आजही करोनाच्या पार्श्वभूमीवर ताज्या होतात. कॅनडा हॉस्पिटलची इमारत मात्र, बीएसएनएल इमारती मागे अजूनही पहायला मिळते. त्याकाळी इतकी सुसज्ज इमारत उभारली गेली हेच नाशिकच्या आरोग्य चळवळी सक्षम असल्याचे प्रतीक आहे.

...

'टाइम्स'च्या वाचकामुळे नवी इमारत

सन १९२० मध्ये एम. जी. जोसेफ या नाशिककर वाचकाने नाशिकमधील कॅनडा हॉस्पिटलबाबत टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना २६ फेब्रुवारी १९२० रोजी एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र ४ मार्च १९२० च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालं. जोसेफ या पत्रात म्हणतात,'महिला आणि मुलांच्या आरोग्यसेवेसाठी मिशनऱ्यांनी सुरू केलेले कॅनडा हॉस्पिटल नाशिक आणि देवळाली या परिसरातील एकमेव सुसज्ज हॉस्पिटल आहे. मात्र, हे हॉस्पिटल अधिक चांगल्या पद्धतीने चालावे यासाठी दानशूरांची गरज आहे. कारण, येथे उपचार घेणाऱ्यांमध्ये नाशिकमधील गरिबांची गर्दी अधिक आहे. तेव्हा दानशूरांनी कॅनडा हॉस्पिटलसाठी दान थेट डॉक्टरांकडे द्यावे.' या पत्राचीच दखल म्हणून की काय, कॅनडातील लोकांनी पुन्हा ३० हजार रुपये हॉस्पिटलसाठी दिले. २३ नोव्हेंबर १९२३ मध्ये कॅनडा हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे नाशिकचे कलेक्टर जे. डब्लू. स्मित यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या इमारतीचे इंजिनीअर वॉन बॉक हे होते. चांदीच्या चावीने कुलूप उघडून या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले होते. १९ जून १९२९ रोजी कॅनडा हॉस्पिटलमध्ये प्रसूतिगृहाची सुरुवात झाली. यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी व्यापारी शामलदास प्रभूदास यांनी आर्थिक मदत केली. पुरिया व रुंग्ठा यांच्या देणग्यातून हॉस्पिटलमध्ये सांसर्गिक रोग प्रतिबंधक विभाग उघडला गेला होता.

...

रोग आणि उपाययोजना

सन १९३४ च्या मे महिन्यात नाशिकमध्ये कॉलरा व टॉयफाइड या साथी भयंकर स्वरूपात आल्या. सन १९३५ साली मे. डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थ यांनी नाशिकचे सार्वजनिक आरोग्य तपासण्यासाठी नेमले.

१९३५-३६ या काळात प्लेगच्या साथीने नाशिकमध्ये धुडगूस घातला होता. यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उंदरांना पकडण्यासाठी पिंजरेही वाटप केले होते.

१९३६ मध्ये नाशिक महापालिकेतर्फे शुश्रुषा हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत पंचवटी येथील अनाथ विद्यार्थिगृहाच्या आरोग्य शाखेतर्फे हे काम सुरू ठेवले होते.

१९२५ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनची स्थापना झाली.

१९४६ मध्ये आयुर्वेद सेवा संघ स्थापन

१९५४ मध्ये वैद्य बिंदूमाधवशास्त्री पंडित व डॉ. वि. म. गोगटे यांच्या विशेष प्रयत्नांतून आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 

Popular posts from this blog

How to reach Shirdi

SAI HERITAGE VILLAGE

Software Development