पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) दि १४ नोव्हेंबर २०२० * ही 'श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत * * पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार * * मुख्यमंत्री उद्धव ठाकरे * मुंबई दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांस...